ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातील शेतकरी करणार ‘ या’ साठी आंदोलन

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील करजगाव येथील बेंद्रे-गायके वस्तीवरील डीपी दोन महिन्यांपासून बंद आहे. सुरुवातीच्या पावसात वीज कोसळून डीपी जळाली होती. यासंबधी तक्रार महावितरणच्या देवळाली प्रवरा कार्यालयात लाभधारक शेतकऱ्यांनी केली होती.

या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्याने तसा लेखी अहवाल ही दिला आहे. बिले भरूनही अधिकारी नवीन डीपी चालू करून देत नसल्याने शेतकरी वर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याठिकाणी शेतकरीच डीपीचे ऑईल बदलणे, केबल टाकणे, लाईनवर सपोर्ट टाकणे, पडलेले पोल विकत आणून बसवणे अशी सर्व कामे स्वखर्चाने करतात.

वरील कामाविषयी देवळाली प्रवरा कार्यालयात सांगूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. एकप्रकारे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून त्रास तर दिला जात नाही ना असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

येथील कर्मचारी लाभधारक शेतकऱ्यांची अडवणूक करून वेठीस धरणे, वाद घालणे असे प्रकार घडत आहे. पुढील पाच दिवसांत डीपी सुरु करून दिली नाही महावितरणच्या देवळाली प्रवरा कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. त्यासंबधी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची राहील असा इशारा करजगाव येथील वीज लाभधारक शेतकऱ्यांनी दिला आहे.

“राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या तालुक्यात डीपीसाठी आंदोलन करण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांची ‘अर्थ’हीन अडवणूक करतात असा आरोप केला जात आहे.

राज्यमंत्र्यांच्या अख्यत्यारीतील खात्याच्या कार्यालयात तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही. श्रीरामपूर मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील ३२ गावांमध्ये करजगाव येत असल्याने ‘ना घरका, ना घाटका’ अशी परिस्थिती झाली आहे.”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe