दोन वर्षांपासून शेती तोट्यात ! कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

नगर तालुक्यातील जेऊर येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथील शेतकरी आदिनाथ बाबासाहेब जरे (वय ३७) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून घराशेजारील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रविवार दि. ४ रोजी माळखास शिवारात घडली.

आदिनाथ जरे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून सुमारे तीन लाख रुपये कर्ज घेतलेले होते. सलग दोन वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात जात आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड करता आली नाही.

अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी, कांद्याला भाव नाही, यामुळे सलग दोन वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात जात आहे. चालू वर्षीही पाऊस झाला नसल्याने शेतीचे उत्पन्न हाती आलेच नाही. त्यामुळे घर खर्च भागवणे देखील अवघड झाल्यामुळेच आदिनाथ यांनी आत्महत्या केली असल्याची माहीती आदिनाथ यांचे भाऊ कानिफनाथ जरे यांनी दिली.

मयत आदिनाथ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान गावातील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने जेऊर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe