अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. एका गटाशी किरकोळ कारणावरुन वाद घालीत दुसर्या गटातील तिघांनी जीवघेणा हल्ला चढवला.
या हल्ल्यात चाकूसारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर झाल्याने एक तरुण अत्यवस्थ झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले, त्यातील दोघांना गजाआड करण्यात आले असून एक संशयित अल्पवयीन असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, गुरुवारी रात्री मदिनानगर परिसरात एका घराच्या ओट्यावर दोघे तरुण गप्पा मारीत बसले होते.
त्यावेळी संशयित आरोपींनी तेथे आला व त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर तिघांनी साहिल व त्याचा मित्र अरशद या दोघा तरुणांना शिवीगाळ व दमदाटी करीत साहील मनियार याच्या पोटात डाव्या बाजूस चाकूने भोकसून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.
त्या दोघांची आरोडाओरड ऐकून तेथे आसपासचे रहिवासी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी तरुणाच्या घरी समजल्यावर त्याचे वडिल व भावाने तेथे धाव घेवून त्या दोघांनाही उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यातील साहिलची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्याला पुढील उपचारांसाठी नाशिकमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी जखमी झालेल्या तरुणाचा भाऊ सोहेल रशिद मनियार याने आज (ता.1) पहाटे साडेतीन वाजता शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अब्रार रऊफ शेख, इम्रान रऊफ शेख व एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. यातील तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याने पोलीस त्याच्या जन्माच्या तारखेची पडताळणी करीत आहेत, त्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved