Ahmednagar News : बिबट्याचे उग्र रूप, वस्तीत घुसत धुमाकूळ, अनेक गाड्यांवर झेप तर दोघांवर हल्ले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार व हल्ल्यांची संख्या वाढत चालली आहे. ग्रामीण भागातील विशेषतः उत्तरेतील नागरिक जीव मुठीत वावरत असल्याचे चित्र आहे. आता श्रीरामपुरातून एक थरारक घटना समोर आली आहे.

बिबटयाने वस्तीत घुसत दोघांवर हल्ले चढवले आहेत. तसेच एक बोकड उचलून नेले आहे. तत्पूर्वी त्याने अनेक गाड्यांवर झडप मारल्याचे लोक म्हणत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे ही घटना घडली. येथील दादासाहेब यांच्या वस्तीजवळील श्रीरामपूर रोडवर श्रीरामपूरहून घराकडे चितळी येथे जाणाऱ्या दोन जणांवर बिबट्याने हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले. मात्र आरडाओरड केल्याने तो रामकृष्ण चौधरी यांच्या डाळिंब बागेत गेला. काही वेळात तो डाळिंब शेतातून मकामध्ये गेला.

दरम्यान, काळे वस्तीच्या शेवटी वस्तीवर राहत असलेल्या अशोक वाघ यांच्या ओट्यावर अचानक बिबट्या दिसल्याने त्यांनी घाबरून आरडाओरड केली असता तो तेथून पळाला. त्यांनी तात्काळ शरद झुराळे यांना फोन केला. झुराळे यांनी फटाके वाजवत असताना जळगाव रोडवरील विजय काटे यांना बिबट्या आल्याची माहिती दिली.

काटे यांनी देखील फटाके वाजवत असतानाच बिबट्याने तेथील एका जणाचा बोकड उचलला. यावेळी परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी फटाके वाजवून त्याला पिटाळले. या घटनेपूर्वी अनेक गाड्यावर बिबट्याने झडप मारली असल्याचे लोक म्हणत आहेत.

बिबट्याचे हे उग्ररूप पाहून अनेकांचे धाबे दणाणले असून भितीचे वातावरण आहे. लोणीमधील दोन मुलांचा बिबट्याने बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच आता श्रीरामपुरात धुडघूस घातला आहे. पिंजरा लावून या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe