पोटगीसाठी न्यायालयात खटला दाखल केला; मात्र न्यायाधीशांसमोर पती- पत्नीने घेतला ‘हा’ निर्णय ..? नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : लग्नच्यावेळी सात फेरे घेतलेले, कोणत्याही एकमेकांची साथ न सोडण्याची शपथ घेतली मात्र किरकोळ कारणावरून पती पत्नीत वाद झाले आणि त्यानंतर यावरून ते दोघेही थेट एकमेकांविरुद्ध थेट न्यायालयात गेले. येथे पोटगीसाठी अर्ज केला होता. त्यामुळे आता कौटुंबिक कलहातून निर्माण झालेला वाद कुटुंब उद्ध्वस्त करत होता. मात्र न्यायालयामध्ये अगदी याच्या उलटेच घडले.

कर्जत न्यायालयातील वरिष्ठ वकील ऍड. उत्तमराव नेवसे यांनी पुढाकार घेत अतिशय छोट्या कारणावरून उद्ध्वस्त होऊ पाहणारे कुटुंब वाचवले. अन पोटगीसाठी अर्ज करणाऱ्या पती- पत्नीचा वाद मिटवत पुन्हा त्यांचे मनोमीलन घडवले आणि या खटल्याचा गुंता राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये सोडवला. न्यायाधीशांनीही ऍड. नेवसे व या तरुण पती-पत्नीचे कौतुक केले.

कर्जत येथे राष्ट्रीय लोक न्यायालय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात आले. या न्यायालयाचे उ‌द्घाटन वरिष्ठस्तर न्यायालयाचे न्यायाधीश दीपक गिरी व न्यायाधीश एम. डब्ल्यू. शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कर्जत तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड . कैलास शेवाळे, उपाध्यक्ष प्रतिभा रेणूकर, सचिव काकासाहेब पांडुळे, गोपाळराव कापसे, वकील संघाचे सदस्य उपस्थित होत्या.

या लोकन्यायालयाच्या निमित्ताने एका कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा सुरळीत बसवून देण्याचे काम ऍड. नेवसे व ऍड. ब्रह्म यांच्या पुढाकारातून झाले. अतिशय छोट्या कारणाने पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला आणि तो न मिटल्यामुळे कर्जत न्यायालयात पोटगीसाठी खटला दाखल झाला.

या वेळी न्यायाधीशांच्या मदतीने दोन्ही वकिलांनी पुढाकार घेतला. पती-पत्नीशी चर्चा केली आणि त्यांच्यामध्ये मनोमीलन झाले. न्यायाधीश गिरी व शेख यांनी स्वतः गुलाबपुष्प देऊन या दाम्पत्याचा सत्कार केला व पुढील आयुष्य कोणताही वाद न करता आनंदाने घालवा, अशा शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व नागरिकांनी टाळ्या वाजवून यांचे स्वागत केले.

या वेळी न्यायाधीश दीपक गिरी म्हणाले की, लोकन्यायालयाचे महत्त्व अतिशय मोठे आहे. या न्यायालयामध्ये दिलेल्या निकालाला कुठेही अपील करता येत नाही. लोकन्यायालयामध्ये नागरिकांनी त्यांचे खटले चालवल्यामुळे कमी वेळेमध्ये आणि अतिशय कमी खर्चामध्ये नागरिकांना न्याय मिळतो आणि छोट्या छोट्या घटनांसाठी नागरिक न्यायालयामध्ये हेलपाटे मारत असतात.

कुठेतरी तडजोड करून पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये सर्व काही सुरळीत करण्यासाठीच खऱ्या अर्थाने येथे काम केले जाते. नागरिकांनी व सर्व वकिलांनी आपले खटले यामध्ये चालवावेत. ऍड. नेवसे म्हणाले, की घटस्फोटापर्यंत आलेल्या प्रकरणात पती-पत्नीचे मनोमीलन घडून दोघांचा संसार सुखाचा सुरू झाला, याचे मोठे समाधान आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीच्या निमित्ताने एका कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा सुरळीत बसवून देण्याचे काम वकील नेवसे व ब्रह्म यांच्या पुढाकारातून झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe