Ahmednagar News : अहमदनगर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या प्रा. सतीश विठोबा शिर्के याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
शिर्के याच्याविरुद्ध शुक्रवारी (दि.९) रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, हा चर्चेचा विषय झाला आहे.नगर शहरात एक नामांकित शिक्षण संस्था असून, त्या शिक्षण संस्थेत प्रा. सतीश विठोबा शिर्के हा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
‘तुला १२ वी च्या प्रॅक्टिकलला पैकीच्या पैकी मार्क देतो, पण तू मला काय देणार’ ? असे म्हणत एका विद्यार्थिनीशी त्याने अश्लिल चाळे करत विनयभंग केला. अशा प्रकारची फिर्याद सतीश शिर्के याच्याविरुद्ध दाखल आहे.
शिर्के हा भूगोल विषय शिकवत असून, त्याने त्या विद्यार्थिनीला केबिनमधून बोलावून २० पैकी २० मार्क देतो, असे म्हणत तू मला काय देशील? असा प्रश्न केला. या प्रकारानंतर गुरुवारी भूगोल विषयाचे प्रॅक्टिकल झाले.
त्या विद्यार्थिनीला मार्क मिळाले. याचा जाब त्या विद्यार्थिनीने केबिनमध्ये विचारला असता त्या प्राध्यापकाने अश्लिल चाळे करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणावरुन प्रा. शिर्के याला तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच अटक केली. शिर्के याला न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि. आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.













