गुटखा तस्करांवर झालेल्या कारवाईत पोलिसांकडून आर्थिक तडजोड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- राहुरी पोलिसांनी शुक्रवारी पकडलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील गुटखा व्यापाऱ्याला नंतर तडजोड करून सोडून दिले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिले अाहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, माहेगाव येथे साध्या गणवेशात पोलीस आले. तेथे एका किराणा दुकानासमोर दडी धरून बसले. त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील एक गुटखा, पानसुपारी, तंबाखू विक्री करणारा व्यापारी स्कुटीवरून आला. त्याने गाडीच्या पिशवीतून गुटखा काढून समोरच्या दुकानदारास देत असताना पोलिसांनी त्याला पकडले.

गुटखा विक्रेत्याच्या गाडीवर साधारण लाखभर रुपयाचा पानमसाला व गुटखा होता. तो जप्त करून संबंधित व्यापाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. गुटखा खरेदी करणाऱ्या दुकानदारालाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. या घटनेची चर्चा काही वेळातच गावात पसरली.

काही ग्रामस्थांनी संबंधित पोलिसांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून महाडिक सेंटर ते मुसळवाडी दरम्यान गाडी थांबविण्यास सांगितली. तेथे आम्ही येतो.

आपण या घटनेवर चर्चा करून मार्ग काढू. परंतु, गुन्हा दाखल करू नका असे म्हंटले. गाव पुढाऱ्यांनी मुसळवाडी येथील एका हॉटेलवर बसून घडलेल्या घटनेवर चर्चा करून गुटखा व्यापारी व किराणा दुकानदार यांना सोडण्यासाठी ‘त्या’ दोन पोलिसांबरोबर आर्थिक तडजोड केली.

यानंतर या दोन्ही व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल न करता पोलिसांनी सोडून दिले, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान या प्रकरणाचा बोभाटा होऊ लागल्याने श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन उपअधीक्षक यांनी दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News