Ahmednagar Ashti Train : रेल्वे मार्गावर अपघाताच्या, बिघाडाच्या घटना घडत असतानाच सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी नगर-आष्टी रेल्वेच्या ५ डब्यांना वाळुंज (ता. नगर) जवळ दुपारी ३ च्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब तत्काळ लक्षात येताच रेल्वेतून प्रवासी उतरवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आग सुरुवातील दोन डब्यांना लागली असतानाच अवघ्या काही मिनिटांतच ही आग ५ डब्यांपर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर- आष्टी रेल्वे मार्गावर सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या पहिल्या दोन डब्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही आग पुढे पाच डब्यांपर्यंत पोहोचली. सुदैवाने गाडीत जास्त प्रवासी नसल्याने कोणालाही इजा झाली नाही. गाडीतील काही प्रवाशांनी आपला जीव वाचविण्यासाठी गाडीतून उड्या मारल्या.
स्थानिक ग्रामस्थ, अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासनाकडून अगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या आगीमध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले असून गार्ड ब्रेक कोच आणि चार डबे असे एकूण पाच डब्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे.
सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान ही आग विझविण्यात यश आले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून गाडीतील प्रवासी वेळेत खाली उतरल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
नगर-बीड-परळी या मार्गावर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या टप्प्यात रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला दोन गाड्या या मार्गांवर सोडण्यात येत होत्या. मात्र या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे सकाळी एकच गाडी सोडण्यात येते. त्यानुसार सोमवारी सकाळी ७.४५ वाजता नगरहून ही गाडी प्रवासी घेवून आष्टीला गेली होती. त्यानंतर सकाळी ११ वाजता तिचा नगरकडे परतीचा प्रवास सुरु होतो.
मात्र सोमवारी ही रेल्वे जवळपास तीन तास लेट झाली. आष्टीहून परतीच्या प्रवासात नारायणडोहच्या पुढे दुपारी ३ वाजता गाडीच्या पहिल्या दोन डब्यांना आग लागली. नगर-सोलापूर महामार्गाच्या क्रॉसिंग जवळच ही घटना घडली.
आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने गाडी थांबविण्यात आली आणि प्रशासनास या संदर्भात माहिती देण्यात आली.
रेल्वे अधिकारी तसेच महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी तातडीने रवाना झाले. तोपर्यंत ही आग पाच डब्यांपर्यंत पोहोचली होती. या घटनेची परिसरात पसरल्याने मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने ही आग विझविण्यात यश आलं आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट होवू शकलेले नाही.
नगर आष्टी रेल्वेला आग लागल्याची माहिती जि.प. सदस्य संदेश कार्ले यांना समजताच त्यांनी रेल्वे पोलीस, तालुका पोलिसांना फोन केले. त्याचप्रमाणे नगर-सोलापूर रोडच्या ठेकेदार कंपनीच्या अधिकारी यांना फोन करून पाण्याचे टँकर पाठवण्याची विनंती केली.
त्यानंतर लगेच अग्निशमनचे अहमदनगर महापालिका, एमआयआरसी, एमआयडीसी यांचे बंब आले. महापालिकेचा एक अद्यावत बंब दुसऱ्या टँकरला जोडून पाणी पुढे पंप करता येतो, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत तो बंब आग विझवत गेला.
स्थानिक नागरिक, जी. एच. की कंपनीचे कर्मचारी, रेल्वे अधिकारी-कर्मचारी, रेल्वे पोलिस, नगर तालुका पोलीस यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली.