पावसाळ्यामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. या काळात लहान मुलांना खूप जपायला लागतं. मुलांना आजारापासून दूर ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे, याबाबत बालरोग आणि नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. बॉबी सदावर्ती अधिक माहिती देत आहेत.
मान्सून हा केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांमध्येही विविध आजारास कारणीभूत ठरतो. पोट फुगणे, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, ओटीपोटात दुखणे आणि कळ येणे, अतिसार, बद्धकोष्ठता, उलट्या, मलेरिया, अन्न विषबाधा, डेंग्यू, टायफॉइड, चिकनगुनिया, हिपॅटायटीस, इन्फ्लूएन्झा आणि श्वसन संक्रमण यांसारख्या अनेक समस्या लहान मुलांमध्येही आढळतात.
सावधगिरी म्हणून खालील टिप्सचे पालन करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.
घर स्वच्छ ठेवणे :
घराजवळील भांडी, डबे आणि फुलदाण्यांमध्ये साचलेले पाणी हे डेंग्यू आणि मलेरियासाठी कारणीभूत असलेल्या डासांची पैदास करतात. साचलेले पाणी स्वच्छ करा, डासांपासून बचावासाठी मुलांनी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत आणि घरात मच्छरदाणी वापरावी. दम्यासारख्या श्वसन संक्रमक आजारास प्रतिबंध करण्यासाठी घरातील कुंड्या, धूळ आणि परागकण टाळा.
संतुलित आहार घ्या :
पालकांनी मुलांच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा आणि उघड्यावरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळावे. घरी तयार केलेले ताजे अन्न खा. रस्त्यावर उपलब्ध असलेली शिळी किंवा कापलेली फळे खाल्ल्याने जीवाणूंचा संसर्ग होऊन गॅस्ट्रोएन्टेरिटिस, अन्न विषबाधा किंवा पोटदुखी होऊ शकते.
वैयक्तिक स्वच्छता राखा :
श्वासोच्छवासाचे संक्रमण टाळण्यासाठी मुलांनी आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवावेत तसेच बुरशीजन्य त्वचेच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी पावसात भिजल्यावर स्वतःला त्वरित कोरडे करणे देखील गरजेचे आहे. मुसळधार पावसात चिखलाच्या पाण्यातून चालून घरी आल्यावर लगेचच हात-पाय स्वच्छ पाण्याने धुवून ओले कपडे बदलून घ्यावे.
सावधगिरी म्हणून या टिप्सचे पालन केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांपासून तुम्ही लहान मुलांचे रक्षण करू शकता, तसेच त्यांचे आरोग्य सुधारण्यात देखील यामुळे मदत होईल.