अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-किरकोळ कारण देखील वादासाठी पुष्कळ ठरते व यामधून मारहाण झाल्याच्या अनेक घटना आजवर घडलेल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पारनेर तालुक्यात घडला आहे.
शेतांमधील पिकांना पाणी देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामध्ये दोघा भावांनी तिसऱ्या भावास शिविगाळ करीत, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत, कपाळावर दगड मारून जखमी केले. वडझिरे येथील लंकेवाडीत ही घटना घडली.
बाळू तुकाराम चौधरी (वय ५८ रा. लंकेवाडी, वडझिरे, ता. पारनेर) हे त्यांच्या घरी असताना त्यांचे इतर दोघे भाऊ साहेबराव तुकाराम चौधरी व आश्रू तुकाराम चौधरी तेथे आले.
तु तुझ्या कांद्याला पाणी भरायचे नाहीस असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर मी कांद्याला पाणी देेतो, त्यानंतर तुम्ही तुमच्या पिकाला पाणी द्या असा सल्ला बाळू चौधरी यांनी दिल्याचा राग येउन साहेबराव व आश्रू यांनी बाळू यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली.
त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत एकाने तेथील दगड उचलून बाळू यांच्या कपाळावर मारला. त्यात बाळू यांच्या कपाळास गंभीर स्वरूपाची जखम झाली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
बाळू लंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहेबराव तुकाराम चौधरी व आश्रू तुकाराम चौधरी (दोघेही रा. लंकेवाडी, वडझिरे) यांच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. एस जी रोकडे हे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved