माळकूप, भाळवणी व ढवळपूरी येथील 137 ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- फिनिक्स सोशल फाऊंडेशन, भारत पेट्रोलियमचे आनंद कुंदन पेट्रोल पंम्प व आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.

नगर-कल्याण रोड, माळकूप (ता. पारनेर) येथील भारत पेट्रोलियमचे आनंद कुंदन पेट्रोल पंम्प येथे झालेल्या या शिबीराचा माळकूप, भाळवणी व ढवळपूरी आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फिजीकल डिस्टन्ससह इतर नियमांचे पालन करुन हे शिबीर घेण्यात आले.

यामध्ये 137 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर 34 गरजूंवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबीराचे उद्घाटन भारत पेट्रोलियमचे कॉर्पोरेशनचे अधिकारी भारत बढे यांच्या हस्ते झाले. यावेळी वितरक प्रकाश मुथा, माळकूपचे सरपंच बाळासाहेब शिंदे, उद्योजक संपत राहिंज, शिबीरचे आयोजक गौतम मुथा, फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदि प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविकात गौतम मुथा म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. महागाई व कोरोनाच्या संकटामुळे उदरनिरवाह करणे कठिण झाले असताना सर्वसामान्यांना खर्चिक आरोग्यसेवा परवडणारी राहिली नाही. ग्रामीण भागातील गरजूंना नेत्र शिबीराचा लाभ मिळण्यासाठी सामाजिक भावनेने या शिबीराचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून संपुर्ण जिल्ह्यात सुरु असलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेची माहिती देऊन नेत्रदान, अवयवदान करण्याचे त्यांनी आवाहन केले. भारत बढे म्हणाले की, भारत पेट्रोलियम फक्त व्यवसाय न करता सामाजिक भावनेने देखील कार्य करीत आहे.

दीन-दुबळ्यांसाठी आनंद कुंदन पेट्रोल पंम्पच्या पुढाकाराने हे शिबीर घेण्यात आले. टाळेबंदीमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत असून, होणारे आरोग्य शिबीर गरजूंना आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी एखाद्या पेट्रोल पंम्पाने सामाजिक भावनेने शिबीर घेणे हे पहिल्यांदाच पाहत आहे.

व्यवसायाला सामाजिक कार्याची जोड दिल्यास जीवनात सुख, समृध्दी निर्माण होते. वंचितांच्या सेवेतच ईश्‍वर सेवा असून, या भावनेने घेतलेले शिबीर कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबीरात नेत्र विज्ञानी संजय शिंदे, प्रशांत शिंदे, ओमकार वाघमारे, रामदास माने यांनी शिबीरार्थीची नेत्रतपासणी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment