अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने जिल्हाधिकारी यांनी रात्रीची संचारबंदी जाहिर केली आहे.
संगमनेरात मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. संचारबंदी असतानाही शहरातील ठिकठिकाणी नागरिकांचा रात्रीच्या वेळी मुक्त संचार होत असतानाही पोलीस व महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
संगमनेर शहरात गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना दाखल झाला होता. शहर व तालुक्यात कोरोनाचे सात हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. मागील महिन्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला होता.
मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळे पाऊले उचलली आहेत. रात्रीच्या संचारबंदीचा आदेश त्यांनी काढला.
संगमनेर शहरात रात्री बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी नागरिक मुक्त संचार करताना दिसत आहे. प्रांताधिकारी, तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बिगर मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दिवसा कारवाई करणारे पोलीस रात्री मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. शहरातील अनेक टपऱ्या व हॉटेलमध्ये नागरिकांची रात्रीच्या वेळी मोठी गर्दी असते.
यामुळे कोरोनाचा प्रसार झपाटयाने वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी याबाबत कडक भूमिका घेण्याची गरज आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|