अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्यांना २४१ कोटींचा निधी ! थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे

Published on -

Ahmednagar News : मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टी सहित सततच्या पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील सततच्या पावसाने केलेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी २४१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे.

याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दि.२० जून रोजी जारी करण्यात आला आहे. मदतीचा निधी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

मागील वर्षी पावसाळी हंगामात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता. या अतिवृष्टीच्या पावसासोबतच जिल्ह्याच्या सर्वदूर शिवारात सततचा पाऊस धुवाधार कोसळला. अतिवृष्टी व सततच्या पावसाने केलेल्या पंचनाम्याचे काम जिल्हा प्रशासनातील महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या सणात पार पाडले.

राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकसानीची पाहणी केली होती. पंचनामाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आला.

त्या अहवालात शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यास जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागणी नोंदवली होती. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना २९१ कोटी रुपयांचा निधी दोन महिन्यापूर्वीच मंजूर झाला. त्याचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरू आहे.

अतिवृष्टीची मदत मिळाल्यानंतर सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले होते. दरम्यान दि. २० जून रोजी राज्यातील १४ जिल्ह्यात सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने एक हजार ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

यात नगर जिल्ह्यातील दोन लाख ९२ हजार ७५१ बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख ९० हजार ४७० हेक्टर बाधित क्षेत्राकरिता २४१ कोटी एक लाख ४३ हजार रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात येत असल्याचे महसूल व वन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe