Ahmednagar News : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करून उत्सव काळात महानगरपालिकेकडून परवानग्या दिल्या जातात. त्यासाठी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून मनपा, महावितरण व शहर वाहतूक शाखा यांच्यातर्फे संयुक्तपणे एक खिडकी योजनेचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
त्यासाठी www.amcfest.in या संकेतस्थळावर गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता गणेश मंडळांना गणेशोत्सवात मंडप उभारणीसाठी धावाधाव करण्याची गरज भासणार नाही.
महापालिकेने शहरातील गणेश मंडळांना मंडपासह विविध परवानग्या घेण्यासाठी सोमवारपासून एक खिडकी योजना सुरू केली आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालय येथे या सुविधेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करून उत्सव काळात महानगरपालिकेकडून परवानगी दिल्या जातात,त्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागात एक खिडकी योजना राबवली जात होती.
मात्र यंदाच्या वर्षीपासून मनपा आयुक्त डांगे यांच्या पुढाकारातून स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यावरून परवानगी दिल्या जाणार आहेत. मात्र, जागामालक अथवा सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्र, तसेच स्थानिक पोलिस ठाण्याची परवानगी गणेश मंडळांना त्यांच्या स्तरावर घ्यावी लागणार आहे.
मंडप उभारणीसाठी रस्त्यावर कुठेही खड्डे घेऊ नयेत, अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल. राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. पर्यावरण रक्षणासाठी मूर्ती शाडू मातीच्याच वापराव्यात. ध्वनी प्रदूषणाबाबत कायदे व शासकीय नियमांचे पालन करावे.असे नमूद करण्यात आले आहे.
या आहेत नियम व अटी
– उत्सव काळातील मंडपाची उंची ४० फुटापेक्षा जास्त नसावी.
– ५० फुटापेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारणार असल्यास सुरक्षिततेसाठी अधिकृत स्थापत्य अभियंत्याकडून स्टॅबेलिटी सर्टिफिकेट जोडावे.
– मंडप व स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन गाड्या जाण्यासाठी रस्ते मोकळे ठेवावेत, गणेशोत्सव संपल्यानंतर तीन दिवसांच्या आत मंडप, रनिंग कमानी,
देखावे, बांधकाम हटवण्यात यावे. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेल्या मंडळांनी
– मिरवणूक सुरू होण्यापूर्वी तेथील मंडप, कमानी काढून घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंडप उभारणीसाठी रस्त्यावर कुठेही खट्टे घेऊ नयेत, अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल, असे मनपा आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.