१०२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाला केंद्रीय मंजुरी देऊन या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटिश काळात मंजुरी मिळून, या रेल्वे मार्गासाठी भूमि अधिग्रहण करून माती भरावाचे काम देखील झालेले आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर हा रेल्वे मार्ग दुर्लक्षित राहिला. २००९ पासून आपण या रेल्वे मार्गाचा पाठपुरावा करीत आहे.
हा रेल्वे मार्ग रखडल्यामुळे नगर व बीड जिल्ह्यातील सहा ते सात तालुक्यांचा विकास खुंटलेला आहे. तसेच हा रेल्वे मार्ग झाल्यास शिर्डी ते तिरुपती बालाजी या दोन जागतिक तीर्थक्षेत्रातील अंतर ५५० किलोमीटर ने कमी होऊन जागतिक तीर्थक्षेत्र जोडले जाऊन यातून भाविकांची सोय होणार आहे.
तसेच या रेल्वे मार्गावर १० ते १२ साखर कारखाने, जिनिंग प्रेसिंग, दूध, डेअरी, फळे, भाजीपाला इत्यादीचे उत्पादन करणारा वर्ग असल्यामुळे रेल्वेला मालवाहतुकीतून अधिकचे उत्पन्न देखील मिळणार आहे.
या रेल्वे मार्गासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ५० टक्के महाराष्ट्र शासनाचे सहभागाचे पत्र रेल्वे बोर्डाकडे दिलेले आहे. वरील रेल्वे मार्गाची सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल जून २०२२ मध्ये केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविलेला आहे.
परंतु गेल्या दोन वर्षापासून हा प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या मार्गाला मंजुरी देऊन या रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार वाकचौरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डाची चेअरमन यांना देण्यात आले आहे.
दरम्यान, बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी यांच्या नेतृत्वाखाली आमचा लढा सुरू आहे. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत राज्य शासनाचे ५० टक्के सहभागाचे पत्र मी मंजूर करून घेतलेले आहे. केंद्रीय मंजुरीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू असल्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे सांगितले.
श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी उपोषण, आत्मदहन आंदोलन केले आहेत. स्व. खासदार दिलीप गांधी, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे या सर्वांचा या कामात सिंहाचा वाटा आहे. मात्र दहा वर्षे सत्ताधारी पक्षाचे खासदार असूनही या रेल्वे मार्गासाठी काहीच प्रयत्न करण्यात आले नाही, याचे वाईट वाटते, असे बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी यांनी सांगितले.