Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील ग्रामपंचायतीचा संगणक परिचालक गणेश बोरुडे याने ग्रामपंचायत कार्यालयात विषारी औषधांचा स्प्रे फवारल्याने कार्यालयातील कामकाज करणाऱ्या महिला व पुरुषांना त्रास झाला आहे.
गणेश बोरुडे व गावातील ग्रामस्थ संदीप ढगे यांच्यातील वादामुळे हा प्रकार घडला आहे. संगणक परिचालक बोरुडे याची बदली करा अन्यथा त्याला कामावरुन काढुन टाकावे, अशी विनंती सरपंच प्रदीप अंदुरे व ग्रामसेवक एकनाथ आंधळे व ग्रामस्थांनी पंचायत समसितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे यांच्याकडे केली आहे.
बोरुडे याचा निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय उघडणार नाही, असा इशारा खरवंडी सरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत पालवे यांची भेट घेऊन वरील विनंती केली आहे.
खरवंडी कासार येथील ग्रामपंचायत संगणक चालक गणेश बोरुडे व गावातील ग्रामस्थ संदीप ढगे यांच्यात वाद आहे. यापूर्वीही ग्रामपंचायतीमध्ये दोघांमध्ये वाद झाले आहेत. बुधवार, दि. २५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गणेश बोरुडे व संदिप ढगे यांच्यात वाद झाला.
या वेळी पशुधन विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, सीआरपीताई, शिपाई व इतर महिला लाभार्थी कार्यालयात उपस्थित होते. या वेळी बोरुडे याने विषारी औषधांचा स्प्रे फवारून पळून गेला.
स्प्रेमुळे तेथील अनेकांना त्रास झाला. त्यामुळे गणेश बोरुडे याला कामावरुन काढा, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय उघडणार नाही, असा इशारा सरपंच प्रदीप अंदुरे व ग्रामविकास अधिकारी एकनाथ आंधळे यांनी व ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.
खरवंडीच्या ग्रामस्थांची संगणक परिचालक गणेश बोरुडे याच्याविषयी तक्रार केली आहे. तक्रार गंभीर स्वरुपाची आहे. ढगे यांनी मला सविस्तर माहिती सांगितली आहे. सरपंच व ग्रामसेवकांचे लेखी माझ्याकडे आले आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई करू.: डॉ. जगदिश पालवे, गटविकास अधिकारी पंचायत समिती, पाथर्डी.