Ahmednagar News : रविवारी (दि.२६) गारपीटीने पारनेर तालुका चांगलाच झोडपून काढला. कोट्यवधींचे नुकसान झाले. यादरम्यान घडलेल्या एका घटनेनं मात्र सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
त्याच झालं असं की एका आजोबांनी आपल्या नातवाला वाचवण्यासाठी गारांचा पाऊस आपल्या पाठीवर झेलला. गारांपासून आपल्या नातवाचे त्यांनी संरक्षण केले परंतु त्यांची गारपिटीने त्यांची पाठ काळी निळी पडली होती. दादाभाऊ पांढरे असे त्यांचे नाव असून ते गांजीभोयरे येथील राहणारे आहेत.
रविवारी निघोज मंडळातील २४ गावांत गारपिटीने कहर केला. गांजीभोयरे गावातील पांढरे परिवारातील नाना पांढरे यांचे वडील दादाभाऊ पांढरे हे रविवारी आपली जनावरे रानात चारत असताना अचानक दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारा पडू लागल्या.
लहान पाच वर्षांचा नातू सोबत असल्याने व जवळपास कुठलाही आडोसा नसल्याने आजोबांनी आपल्या पाच वर्षांच्या नातवाला पोटाखाली धरले व स्वतः गारांचा भडीमार आपल्या पाठीवर झेलला. सध्या या आजोबांची खूप चर्चा आहे.
गारपिटीचा प्रचंड फटका तालुक्यात बसला. तसेच याच परिसरातील काही इसम गारपिटीने बाधित झाले. एक महिला गारपिटीने व फांदी अंगावर पडल्याने बेशुद्ध झाली. तिच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान सध्या प्रशासन पंचनामे करत आहे. शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे.