Ahmednagar News : शहरात आपले घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, नवीन घर घेतल्यानंतर मनपात नोंद करावी लागते, मात्र
अनेकजण मनपात नोंदणी करताना दाखवलेल्या मालमत्तेपेक्षा नंतर जास्त बांधकाम करतात मात्र त्याची नोंद करत नाहीत, मात्र आता अनेक बोगस मालमत्ताधारक महापालिकेच्या रडारवर आले आहेत.
मागील २० वर्षात शहराचा मोठा विस्तार झाला आहे. अनेक ठिकाणी नव्याने बांधकामे झाले असून जुनी घरे पाहून इमारती उभा केल्या आहेत. अशा ठिकाणी मात्र जुनीच कर आकारणी केली जाते. आज शहराचा विस्तार वेगाने होत आहे, दररोज नव्या इमारती उभ्या राहत आहेत. परंतु महापालिकेच्या दप्तरी केवळ एक लाख ३१ हजार मालमत्तांचीच नोंद आहे.

या मालमत्ताधारकांकडून जून्याच पद्धतीने कर आकारणी केली जाते. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रूपयांचा कर बुडत आहे. त्यामुळे या वाढत्या शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देताना मनपा प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे अनेकदा अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
मालमत्ता कर वसुली हा उत्पन्नाचा मार्ग असताना मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत असल्याने मनपाची आर्थिक स्थिती हलाकीची आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना करत सवलत देऊन देखील कर भरला जात नसल्याने आता कर आकारणीचे फेर मुल्यांकन करणे, तसेच बोगस मालमत्तांचा शोध घेण्याच्या उद्देशाने शहरातील सर्व मालमत्तांचे मोजमाप करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
खासगी ठेकेदार संस्थेला हे काम देण्यात आले असून, मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात देखील झाली आहे. इमारती, घरे, मोकळ्या जागा, ओढे- नाले, तसेच इतर मालमत्तांचे जीआयएस मॅपिंगद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. शहरातील एक लाख ३१ हजार इमारती, घरे, भूखंडांचे जीआयएस मॅपिंगद्वारे मोजमाप सुरू झाले आहे.
या दोन महिन्यात अडीच हजार मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली आहे. यात मनपाकडे नोंदणी असलेल्या मालमत्तेपेक्षा ३० टक्के पेक्षा अधिक वाढीव बांधकाम केल्याचे आढळून आले आहे. हे वाढीव बांधकाम आता कर कक्षेत आले आहे.
सर्व्हेक्षणानंतर महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शहरातील सर्व मालमत्तांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती एकत्रित करून सुधारीत कर प्रणाली विकसित करण्यात येणार आहे.