शिर्डी, दि.२२ जून (उमाका वृत्तसेवा):- सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पुणतांबा मंडळातील सुमारे ११ गावांतील ६ हजार २८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाख रुपयांची शेती पिकांची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची
माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. या संदर्भात माहिती देताना विखे पाटील म्हणाले की, जून २०२२ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
तालुक्यातील पुणतांबा महसूल मंडळातील पुणतांबा, रस्तापूर, वाकडी, धनगरवाडी, न.पा.वाडी, रामपूरवाडी, जळगाव, एलमवाडी, शिंगवे, चितळी, संभाजीनगर या ११ गावांमधील सुमारे ६ हजार ४७५ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसान झालेले होते.
या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मदतीच्या आलेल्या प्रस्तावाचा विचार करुन राज्य सरकारने अतिवृष्टीचा निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरीता विशेष बाब म्हणून पुणतांबा महसूल मंडळातील ११ गावांकरीता मदत जाहीर केली आहे.
या मदतीचा लाभ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असून सदर मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने जमा होणार असल्याचे महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी स्पष्ट केले.