Ahmednagar Rain : पारनेर तालुक्यातील सुपा या कोरडवाहू भागात दिर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी (दि. २१) सायंकाळी व शुक्रवारी (दि.२२) दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने फळबागांसह रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे. खोळंबलेल्या ज्वारीच्या पेरण्या करता येणार असल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी सायंकाळी सुरु झालेला पाउस रात्री उशीरपर्यंत कोसळत होता व शुक्रवारी दुपारनंतरही त्याने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते, बाजारतळाला तळ्याचे स्वरूप आले असून संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
नदीनाल्यातून पाणी वाहत असून सुपा परिसरात या वर्षी एकही मोठा पाऊस झाला नव्हता, त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. आता रब्बी हंगामही वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती.
परंतु दिर्घ प्रतिक्षेनंतर यंदा प्रथमच मोठ्या स्वरूपात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला असून त्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पाणी टंचाई व चारा टंचाईच्या समस्येमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाची ही समस्या निसर्गानेच मिटवल्याने त्याने वरुणराजाचे आभार मानले आहेत.
बळीराजासह वन्यप्राणी व पाण्यासाठी पायपीट करणाऱ्यांना दिलासा मिळाला असून थोड्याशा ओलीवर ज्वारीची पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे व मशागत वाया जाते की काय ? अशी शक्यता निर्माण झाली असतानाच काल झालेल्या जोरदार पावसाने बळीराजा सुखावला आहे.
इतर पिकांसह फळ बागांनाही जीवदान मिळाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे. जलसंधारणच्या कामातून तयार करण्यात आलेले साठवण बंधारे देखील मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत होते. त्यात काही प्रमाणात पाणी साचले आहे.
पावसाने उशिरा का होईना कृपादृष्टी दाखवल्याने दोन दिवसात या परिसरात झालेल्या पेरणीयोग्य पावसाने रखडलेल्या पेरण्या मार्गी लागणार आहेत. पावसाळाच्या शेवटास पावसाने जिल्हाभर हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
यंदाही पावसाने पावसाळ्यातच दडी मारल्याने सुपा परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाणी व चारा टंचाईमुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पशुधन जगवावे कसे? याची चिंता त्याला लागली होती. ऐन पावसाळ्यात दुष्काळाचे चटके सहन करावे लागत होते.
आजपावेतो समाधानकारक व मुबलक पाणीसाठा उपलब्ध होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाउसच पडलेला नसल्याने शेतकरी हतबल असतानाच निसर्गाने कृपा केल्याने परिसर आनंदमय झाला आहे. दुष्काळामुळे थंडावलेले उद्योग व्यवसाय आता सुरळीत सुरु होतील अशी आशा व्यापारी वर्गांसह सर्वांनाच लागली आहे.