Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील साकत परिसरात शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी (दि. २४) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अनेक वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला, तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन पिके पाण्याखाली गेली आहेत.
या पावसामुळे साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे संपर्क तुटला होता. सकाळी सातनंतर पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली. शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोजच प्रवास करावा लागत आहे.
साकत-कोल्हेवाडी मार्गावर साकतजवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
जामखेड तालुक्यातील साकत परिसरात जूनपासून दररोज पाऊस सुरू आहे. फक्त आठ दिवस पावसाने खंड दिला. परत पाऊस सुरू झाला. शुक्रवारी रात्री परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे लेंडी नदीला पूर आल्यामुळे संपर्क तुटला. सकाळी पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली.
सध्या जामखेड-सौताडा महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. यातच सौताडा जवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे अनेक वाहनधारक तसेच बीड, पाथर्डी कडे जाणारे वाहने पिंपळवाडी मार्गे वांजरा फाटा मार्गे जातात.
पण आता पूल खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. साकत-कोल्हेवाडी-कडभन वाडी यांना जोडणाऱ्या लेंडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला. साकत-कोल्हेवाडी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला. लेंडी नदी व वांजरा नदीला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. पहाटे झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला. यातच कडभनवाडी, कोल्हेवाडी, वराट वस्ती, कवडवाडी परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला.
अनेक दुधवाले व विद्यार्थी अडकले होते. सकाळी पाणी कमी झाल्यावर वाहतूक सुरू झाली. काही विद्यार्थी परत माघारी गेले. पाऊस झाला की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.