विळद पिंप्री ता. नगर येथील सतिश मारूती होडगर या १५ वर्षीय मुलाच्या हातावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री सहायता निधीमधून अवघ्या एक दिवसांत एक लाख रूपयांची मदत संबंधित रूग्णालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर लोकसभा मतदासंघातील विळद पिंपरी, ता. नगर येथील सतिश मारूती होडगर वय १५ या इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्याथ अपघातात जखमी झाला. अपघातात त्याच्या हाताला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांकडून हातावर शस्त्रक्रीया करावी लागेल असे सांगण्यात आले.

होडगर यांच्या घरची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने विळद पिंप्री येथील खा. नीलेश लंके यांच्या समर्थकांनी खा. लंके यांच्या संपर्क कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे सतीश याच्या शस्त्रक्रीयेसाठी मदतीचा प्रस्ताव सादर केला. संसदीय अधिवेशनानिमित्तताने नवी दिल्लीत असलेल्या खा. लंके यांच्याशी संपर्क करून सतिशच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने मदत मिळवून देण्याचे साकडे घालण्यात आले.
खा. लंके यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाशी संपर्क करून सतिशच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार एकाच दिवसांत संबंधित रूग्णालयाच्या खात्यावर एक लाख रूपयांची रक्कम वर्ग करण्यात आली.
सतीश याचे वडील मारूती होडगर यांचा अपघातात एक डोळा कायमचा निकामी झालेला आहे. दिव्यांग असल्याने त्यांना जड कामाची नोकरी मिळू शकली नाही. सध्या ते एका रसवंती गृहामध्ये रोजंदारीवर काम करून तर आई मोजमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करत आहेत.
सतीश यास २० वर्षांची बहिण आणि १२ वर्षांचा लहान भाउ आहे. अशा स्थितीमध्ये सतिशच्या हातावर शस्त्रक्रीया करणे मोठे आव्हान होते, मात्र खा. नीलेश लंके यांनी व त्यांच्या संपर्क कार्यालयातील यंत्रणेने मुख्यमंत्री सहायता कक्षाशी संपर्क करून सतीश याच्या शस्त्रक्रियासाठी मदत मिळवून दिली.
सतीशच्या पालकांची कृतज्ञता
मोल मजुरी करून आम्ही आमच्या प्रपंचाचा उदरनिर्वाह करत आहोत. अशा हालाखीच्या परिस्थितीत सतीश याच्या हातावरील उपचारासाठी पैसा उभे करणे अशक्य होते. खा. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदतीचा प्रस्ताव पाठवून मदत मिळउन दिल्याबददल खा. लंके यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याप्रती सतीशच्या पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
खा. नीलेश लंके यांची तत्परता
सतीशच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने एक तासात मदत रूग्णालयाच्या खात्यावर वर्ग केली हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे. खासदार नीलेश लंके हे त्यांच्या मतदासंघाबरोबरच राज्यातील अनेक रूग्णांसाठी मदतीची शिफारस करतात. त्यांच्यासह त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून ही मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असतो.- रामेश्वर नाईक कक्ष प्रमुख मुख्यमंत्री सहाययता निधी