अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या काही दलालांनी महसूल खात्यातील काहीजणांना हाताशी धरून तहसीलदारांच्या बनावट सह्या व शिक्के वापरून बोगस अकृषिक आदेश तयार केले व त्यातील प्लॉट दुय्यम निबंधक कार्यालयाला हाताशी धरून त्याची सर्वसामान्य नागरीकांना विक्री केली आहे.
यात सामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक तर झालीच आहे. शिवाय शासनाचाही कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी व संबधितांवर कारवाई करावी अन्यथा या संदर्भात ईडीकडे दाद मागण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिला आहे.

मागील काही वर्षापासून शेवगाव नगरपरिषद हद्दीत तहसीलदारांच्या बनावट सह्या व शिक्के वापरून अकृषिक आदेश तयार करून त्याआधारे खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.
तसेच बेकायदेशीर गुंठेवारीचे व्यवहार होत आहेत. शहरात होत असलेल्या या बेकायदेशीर व्यवहारांमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात नागरी समस्या निर्माण होणार आहेत.
सध्या निर्माण होत असलेल्या वसाहती नगर रचना विभागाच्या कोणत्याही नियमात बसत नाहीत. या संदर्भात तत्कालीन तहसीलदारांकडे आपण तक्रार केली होती.
तेंव्हा त्यांनी मी असे कोणतेही आदेश दिलेले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तरी या सर्व प्रकरणांची चौकशी करून त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी मुंडे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













