Mula Dam Water Level Today : मुळा धरण किती भरले ? जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Mula Dam

Mula Dam Water Level Today : राहुरी तालुक्यातील मुळानगर येथील मुळा धरणाचा पाणीसाठा ४० टक्के झाला आहे. धरण साठ्यात नवीन पाण्याची आवक सुरू आहे; परंतु अजूनही पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणसाठा संथ गतीने वाढत आहे.

धरणात सुमारे ११ हजार २ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा असून लहित खुर्द ( कोतूळ) येथील सरिता मापक केंद्र येथून २ हजार ९२२ क्यूसेकने आवक होत आहे. मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर सलग चार वर्षांपासून पावसाची कृपा राहिली आहे.

परिणामी धरणसाठा समाधानकारक राहिला. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेला मुळा धरणाचा साठा मान्सून हंगाम प्रारंभी ८ हजार ८०० दशलक्ष घनफूट इतका होता. धरण साठ्यामध्ये कमी जास्त प्रमाणात नविन पाण्याची आवक होत आहे.

रविवारी धरणाच्या लाभक्षेत्र असलेल्या राहुरी हद्दीमध्ये रिमझिम सरी कोसळत होत्या. लाभक्षेत्राला अजूनही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. मान्सून हंगामात लाभक्षेत्र व पाणलोट क्षेत्रावर मोठ्या पावसाचा वर्षाव अपेक्षित झालेला नाही;

परंतु पाणलोट क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड, पांजरे, कोतूळ हद्दीमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर ७१ हजार हेक्टर तर डाव्यावर १० हजार हेक्टर असे एकूण ८१ हजार हेक्टर अवलंबून आहे.

पणलोट क्षेत्र सुमारे ४० किमी अंतराचे आहे. हरिश्चंद्रगड, कोतूळ, आंबीत, पाचणे, लहीत, साकूर, मांडवे, पिंपळगाव खांड, घारगाव क्षेत्र हे पाणलोट क्षेत्र समजले जाते. तर मुळा धरणावर आधारित असलेला राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, नगर या पाच तालुक्यातील हद्द लाभार्थी गावे समजली जातात.

रविवारी सायंकाळी ५ वाजता २ हजार ९८४ क्यूसेकने नविन पाणी धरणात जमा होत होते. तर पाणी साठा १० हजार ७०० दलघफू इतका झाला होता. मागिल वर्षी आजच्या तारखेला धरण साठा १४ हजार ४३५ दलघफू इतका होता. मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये ५० वर्षांपासून पाणी जमा होत आहे. त्यापैकी ३३ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले. पाणलोट क्षेत्रावर कमी जास्त प्रमाणात आषाढी सरी कोसळल्याची माहिती शाखाभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe