आर्मीत भरतीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन शेकडो युवकांची केली फसवणूक ; पोलिसांनी केली अशी कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवी दिल्ली येथील भरतीपूर्व प्रशिक्षण सेंटरशी संपर्क करुन युवकांना देहराडून व अहमदनगर येथील आर्मी परिसरात बोलावून घेत.

त्या युवकांना प्रशिक्षण देतो असे सांगून व पैसे देणाऱ्या उमेदवारांना सैन्य दलातील मुख्य अभियंता अधिकारी आणि सेवानिवृत्त दक्षिणी कमान मुख्य अधिकारी यांच्याकडील बनावट नियुक्तीपत्र देत त्यांची फसवणूक करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील सत्यजित भरत कांबळे यास जेरबंद केले आहे.

याबाबत अडीच वर्षांपूर्वी फिर्यादी भगवान काशिनाथ घुगे (रा. पास्ते, ता. सिन्नर, जि. – नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सत्यजित भरत कांबळे याच्यासह बापू छबू आव्हाड (रा. आंबेगाव, पो. पाचोरा, ता. येवला, जि. नाशिक) व राहुल सुमंत गुरव (रा. चौसाळा, जि. बीड) यांच्यावर संगनमत करून फसवणूक केल्याचा गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता.

भारतीय सैन्य दलात भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना दि. फेब्रुवारी २०२२ – ते दिनांक २८ मे २०२२ या कालावधीत आर्मी कॅम्प जामखेड रोड येथे आरोपींनी आम्ही मेजर पदावर नोकरीस आहे असे भासवून तसेच आर्मीचा गणवेश परिधान करून आम्ही तुम्हाला आर्मीमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले.

या माध्यमातून महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवी दिल्ली येथील युवकांना संपर्क करुन विविध कॅम्पमध्ये त्यांना ट्रेनिंग देत त्यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम व आरटीजीएस, ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेवून फसवणूक केली. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना भिंगारचे सपोनि जगदीश मुलगीर यांना गोपनीय माहिती मिळाली की, सत्यजित कांबळे हा दिल्ली येथे राहत आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पथक व दक्षिणी कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी संयुक्त कारवाई करुन सत्यजित भरत कांबळे याचा शोध दिल्ली येथे जाऊन घेतला असता तो महाराष्ट्रात पळून गेल्याचे तांत्रिक विश्लेषणाआधारे निष्पन्न झाले.

त्यास दि. ११ सप्टेंबर रोजी बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे सापळा रचून जेरबंद करण्यात आले. चौकशीत त्याने गुन्हयाची कबुली देऊन मी व माझे साथीदार यांनी भारतीय सैन्य दल व मिलीटरी इंजिनिअरींग सर्व्हिसेस येथे अधिकारी म्हणून भरती करुन देतो असे म्हणुन शेकडो युवकांकडून प्रत्येकी ७ ते ८ लाख रुपये घेतले, असे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe