मलाही अनेक प्रलोभने दाखवण्यात आली, पण मी…. : माजी राज्यमंत्री तनपुरे यांचा गौप्यस्फोट !

Ahmednagarlive24 office
Updated:

Ahmednagar News : आजच्या राजकारणात काहीही घडू शकते, पण मी निष्ठावंत राहिल्याचा मला अभिमान आहे. अनेक प्रलोभने दाखवण्यात आली, पण मी त्याला बळी पडलो नाही. कुणाचा विश्वासघात केला नाही, त्यामुळे मला सुखाची झोप लागते. असा गौप्यस्फोट माजी राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.

वांबोरी साहित्य मित्र मंडळ आयोजित तिसऱ्या वांबोरी कला महोत्सवात आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निसर्गमित्र संदीप राठोड, वांबोरी गावचे सरपंच किरण ससाणे, माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सरपंच नितीन बाफना व स्वागताध्यक्षा अचला झंवर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे तनपुरे म्हणाले, आजच्या राजकारणात काहीही घडू शकते पण मी निष्ठावंत राहिल्याचा मला अभिमान आहे. अनेक प्रलोभने दाखवण्यात आली, पण मी त्याला बळी पडलो नाही. कुणाचा विश्वासघात केला नाही, त्यामुळे मला सुखाची झोप लागते.

कला व साहित्यातून समाजजीवन अधोरेखित होते. ग्रामीण भागात भरणाऱ्या कला महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते, त्यामुळे ग्रामीण भरणारा हा कला महोत्सव भविष्याची नांदी ठरेल व यातूनच कलाकार घडतील.

माझ्या शिक्षणाचा उपयोग राजकारणात होत असून मी गरज पडेल तसे वरिष्ठांचे सल्ले घेतो. लोकांना भेटणे, त्यांचे सुख-दुःख वाटून घेणे व सामाजिक क्षेत्रात काम हीच आवड असल्याने मी राजकारणात आलो. वृक्षमित्र योजना काळाची गरज असल्याने त्यासाठी विशेष प्रयत्न करू, असे देखील तनपुरे यांनी सांगितले.

दरम्यान नगरमध्ये पोलिस प्रशासनाविरुद्ध खासदार निलेश लंके यांनी मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. खासदार लंके यांनी आपण हे उपोषण करू नये यासाठी विविध प्रलोभने दाखवण्यात आली. त्यात ५ कोटी रुपये देखील देऊ असे आमिष दाखवण्यात आल्याचे देखील आरोप केला होता.

या पार्श्वभूमीवर आमदार तनपुरे यांनी यांनी देखील राजकारणात अनेक प्रलोभने दाखवण्यात आली असा गौप्यस्फोट केल्याने आता लंके यांच्या आरोपात काही तरी तथ्य असल्याचे बळ मिळत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe