वडिलांच्या नियुक्तीची जुनी कागदपत्रे मिळत नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्रवेशद्वारात कुटुंबीयांसह ठिय्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- नगरपालिकेत सफाई कामगार असलेल्या वडिलांच्या नियुक्तीची जुनी कागदपत्रे मिळत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारात कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन केले.

महापालिकेचे गेट बंद आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी आंदोलकांना रोखले. सदर मागणीचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना देण्यात आले. डॉ. पठारे यांनी आस्थापनेला सदर कागदपत्राची विचारपुस केली असता सदर कागदपत्रे गहाळ असल्याची माहिती मिळाली.

मात्र काते परिवार कागदपत्र मिळण्यावर ठाम असून, अन्यथा महापालिकेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात रविंद्र मिसाळ, ज्योती मिसाळ, सुशिला काते, शंकर काते, सिताबाई रोकडे, सुनिता वैरागर आदि सहभागी झाले होते. शंकर काते हे नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते.

त्यांना कायमस्वरुपी कामाची नियुक्ती देण्यात आली होती. परंतु सिताराम वाघमारे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे त्यांचा वारस दाखवून नोकरी मिळवली असल्याचा आरोप काते यांनी केला आहे. आई, वडिलांना धमकावून सदर कागदपत्रे नगरपालिकेत दाखल केले.

मी व माझे भाऊ लहान व अशिक्षित असल्याने काही करता आले नसल्याचे काते यांनी निवेदनात म्हंटले आहे. सदर व्यक्ती 35 ते 40 वर्षापासून नोकरी करत होता. त्यानंतर त्या जागेवर त्याच्या मुलास नोकरी लावण्यात आली आहे. मात्र शंकर काते यांचे कुटुंबीय हक्काच्या नोकरीपासून वंचित असून, त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

सदर प्रकरणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने महापालिकेच्या आस्थापना प्रमुखांना शंकर काते यांच्या नोकरीची जुनी ऑर्डर व कागदपत्रे सादर करण्याचे सांगितले आहे. महापालिकेच्या संबंधीत अधिकार्‍यांनी सदर कागदपत्रे न्यायालयात सादर करु असे खोटे आश्‍वासन काते परिवाराला दिले होते.

मात्र महापालिकेत सदर कागदपत्रे उपलब्ध नसल्याने काते परिवाराने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच वडिलांच्या नियुक्तीची जुनी कागदपत्रे देण्याची मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment