कुकडी डावा कालव्याचे येत्या २५ मे पासून आवर्तन सोडण्याची मागणी मा. आ. नीलेश लंके यांनी कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य सचिव तथा अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात अधिक्षक अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, कालवा सल्लागार समिती कुकडी व घोड प्रकल्पाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली दि.२० ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामाचे सन २०२४ चे आवर्तन सध्यस्थितीमध्ये हवामानाचा व पावसाचा अंदाज घेऊन, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सोडण्याबाबत चर्चा झाली होती. तसे निर्देशही अध्यक्षांनी दिले होते.
मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरीकांना पिण्यासाठी तसेच जनावरांच्या चारा पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दि. २५ मे पासून आवर्तन सुरू करण्याची शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात येत आहे. या मागणीचा विचार करून येत्या २५ मे पासून आवर्तन सुरू करण्याची मागणी लंके यांनी अधिक्षक अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.