श्रीरामपूरात गोल्टी कांद्याला अकराशेंचा भाव

Ahmednagar News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळ्या गोल्टी कांद्याला अकराशे ते दीड हजाराचा बाजारभाव मिळाल्याची माहिती सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

काल बुधवारी (दि.८) एकुण ८ हजार २८० कांदा गोण्याची आवक झाली होती. सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर एक नंबर प्रतिचा कांदा १५०० ते दोन हजार पुकारला गेला. तर दोन नंबर कांद्याला एक हजार ते दीड हजाराचा भाव मिळाला.

तर तीन नंबर कांदा ३०० ते एक हजार रुपये भावाने विकला गेला. तर गोल्टी कांद्याला १३०० ते १७०० रुपयांचा दर मिळाला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सोमवार, बुधवार व शुक्रवारी सुरू आहेत. काल बुधवारी लुज (मोकळा) कांद्याची एकुण १५१ वाहने दाखल झाली होती.

त्यावेळी एक नंबर मोकळा कांदा १३०० ते १७०० रुपये विकला गेला. दोन नंबर मोकळ्या कांद्याला ९०० ते १३०० रुपये दर मिळाला. तर तीन नंबर मोकळ्या कांद्याला ४५० ते ९०० रुपयांचा दर पुकारला गेला. तसेच मोकळ्या गोल्टी कांदा ११०० ते १५०० रुपयांनी विकला गेला आहे.