Ahmednagar News:शेतकऱ्यांच्या पाठीमागील अडचणी थांबण्याचे काही नाव घेत नाहीत. एकीकडे अतिवृष्टी, दुष्काळ, शेतमालाचे कोसळलेले दर वाढती महागाई त्यापाठोपाठ आता लंपी स्किन रोगाचा विळखा दिवसंदिवस आणखी घट्ट होत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ११६ जनावरांना या आजाराची लागण झाली असून, यात ११५ गायी व १ म्हशीचा समावेश असून, यातील राहाता, राहुरी व पाथर्डी या तालुक्यातील बाधित असलेल्या तिन जनावरांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभुमीवर बाधित जनावरे असलेल्या १३८ गावातील बाधित असलेल्या पाच किलोमीटर भागात लसीकरणाचे काम पशूसंवर्धन विभागाने हाती घेतले आहे.
दिवसागणिक लम्पी रोगांचा जनावरांमध्ये फैलाव वाढत असून सुरूवातीला या रोगामुळे जनावरे दगावणार नसल्याचा दावा पशूसंवर्धन विभागाकडून केला होता.
मात्र त्यांचा अंदाज चुकला असून राहाता, राहुरी आणि पाथर्डी या तालुक्यातील तिन जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दुसरीकडे आतापर्यंत १३८ गावात १ लाख ६८ हजार ३७१ जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असून, आतापर्यंत १ लाख ९ हजार २०० लसींचे तालुकानिहाय वाटप करण्यात आले असून, गाव पातळीवर ७६ हजार ५२ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जल्हिा पशूसंवर्धन अधिकारी संजय कुमकर यांनी दिली.
लम्पी स्किन आजाराबाबत आता जिल्हा परिषदेसोबत राज्य सरकारचा कृषी आणि पशूसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. आजाराच्या नियंत्रणासाठी जल्हिा आणि तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.
या समित्या लम्पी आजाराच्या संनियंत्रणाचे काम करणार असून लसीकरण सोबत बाधित भागातून जनावरांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक थांबवण्याचे आदेश काढण्यात आले आहे.
या कामात दिरंगाई करून आजाराचा प्रार्दुभाव वाढवणाऱ्यांवर दंडात्मक आणि अन्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभुमीवर अनेक भागातील जनावरांचे बाजार देखील बंद ठेवण्यात आले आहेत.