अहमदनगरमधील शिवसेनेचे ‘ते’ दोन गट ‘ह्या’ मंत्र्यांच्या भेटीला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर मधील शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शिवसेनेचा बुलंद आवाज अशी ओळख असलेले अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेचा आवाज कमी झाल्याचे बोलले जात आहे. याच धर्तीवर राठोड यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले शिवसेनेचे नगर शहरातील नगरसेवक, पदाधिकारी शुक्रवारी जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांच्या भेटीसाठी सोनईत पोहचले.

शहरातील शिवसेना पक्षाची पक्ष संघटना वाढवणे, शहरात शिवसेनेचे प्राबल्य असले तरी महापालिकेत कामे होत नाहीत. शहरातील जनतेला कोरोना संसर्गात प्रभावीपणे मदत व्हावी, यासाठी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नेते यांनी त्यांची भेट घेलती. याचर्चे दरम्यान पक्षातील दोन गटांनी एकमेकांवर आरोप सुरू केले.

मात्र, ऐनवेळी या चर्चेत हस्तक्षेप करत मंत्री महोदयांनी दोन्ही गटांना शांत केले. तसेच भविष्यात शहरात पक्षाला पुन्हा गतवैभव आणावयाचे असल्यास दोन्ही गटांनी एक पाऊस मागे येण्याची सूचना केली. ही सूचना शिवसैनिकांनी मान्य केल्याने शिवसैनिकांच्या मनोमिलनाला मंत्री गडाख यांना यश आल्याचे बोलले जात आहे.

शुक्रवारी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार विजय औटी, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, अशोक बडे, गणेश कवडे,

दत्ता कावरे, योगीराज गाडे यांच्यासह अन्य नगरसेवक व पदाधिकार्‍यांसोबत मंत्री गडाख यांची बैठक झाली. आगामी वर्षात महापौर पदाची निवडणूक आहे. 24 नगरसेवक असतानाही विरोधात बसण्याची वेळ आलीय. शहरात संघटन वाढीसाठी आता तुम्हीच लक्ष द्या, ताकद द्या अशी गळ यावेळी मंत्री गडाख यांना घालण्यात आली.

आपसातील भांडणात संघटनेसोबतच वैयक्तिकही तोटा सहन करावा लागतो. तुम्ही एकत्र आले तर मला जोमाने काम करता येईल. नाहीतर तुमचे भांडण मिटविण्यातच माझी ताकद वाया जाईल असे सांगत मंत्री गडाखांनीही एकजुटीचे आवाहन केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment