Ahmednagar News : केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत गरीबांना केंद्रस्थानी मानून दारिद्रयरेषेखालील कुटूंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे .
शहरी व ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थी कुटुंबाना असे धान्य पुरवले जाते. मात्र अनेकदा स्वस्त धान्य दुकानदाराकडून नागरिकांना धान्य वाटप करताना गैरप्रकार होत असल्याच्या घटना घडत आहेत.
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनईजवळील खेडले परमानंद येथील स्वस्त धान्य दुकानदाराने केवायसीच्या नावाखाली जून महिन्याचा रेशनचा साठाच गायब करण्याचा प्रकार उघडीस आला आहे. यामुळे पुरवठा विभागाच्या कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर टांगली गेली आहेत.
यापूर्वीही नेवासा पुरवठा विभागाचा मयत विवाहित आणि स्थलांतरित झालेल्या नागरिकांचा साठा गेल्या पंधरा वर्षापासून कुठे जातो? याबाबत चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर प्रशासनाने रेशनकार्डमधील सर्व नावांची केवायसी करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली.
त्यातही कळस म्हणजे खेडले येथील दुकानदाराने जून महिन्याचा रेशनचा साठा गायब करण्याचा प्रकार उघडीस आला आहे. संबंधित धान्य दुकानदाराने लोकांचे अंगठे घेऊन जून महिन्यातील रेशनचे वाटप झाल्याचे पुरवठा विभागाला दाखविले आहे.
मात्र, प्रत्यक्षात जून महिन्यातील रेशन वाटप झालेच नाही. दुकानदाराला विचारणा केली असता अप्पर तहसीलदार यांनी रेशन दुकानाला सील ठोकल्यामुळे रेशन वाटप करता आले नाही, अशी बतावणी केली. परंतु या गोष्टीमुळे खेडले परमानंद येथील लाभधारक धान्यापासून वंचित राहिले. संबंधित अधिकाऱ्याने चौकशी करून संबंधित अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार यांची चौकशी करून राशन देण्याची मागणी होत आहे.
पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराची यापूर्वी देखील अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. त्यात सुधारणा करण्यात आल्या मात्र आजही या विभागात मोठ्या प्रमाणात नियोजनाचा अभाव असल्याचे समोर येत आहे.