राज्यात गेले चार दिवस ठिकठिकाणी कमी-अधिक तसेच जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडला तसेच हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज, यलो अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या भागात नव्याने कमी दाबक्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोमवारी कोकण विभागात दमदार पाऊस पडला. रत्नागिरी येथे ९१ मिमी पाऊस पडला तसेच मुंबई २१, सांताक्रुझ ४८, अलिबाग २२ तर डहाणू येथे ६ मिमी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे.
कोल्हापूर, महाबळेश्वर, सातारा येथे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड येथे पाऊस बरसला.
विदर्भातील बुलढाणा, वर्धा येथे जोरदार पाऊस पडला. अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर येथेही पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे विदर्भातील जनसामान्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
येत्या १६ ते १९ जुलैदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज, यलो अलर्ट असून, जोरदार पाऊस पडणार आहे. तर, किनारपट्टी भागावर सोसाट्याचा वारा वाहणार आहे.
घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून काही भागात यलो अलर्ट आहे.