अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-के.के. रेंज संदर्भात दिल्लीत सरंक्षणमंत्री आणि लष्कर प्रमुख यांच्यासोबत चर्चा केली असून त्याचा तपशील माजी आ. शिवाजीराव कर्डिले आणि मी बाधित तालुक्यातील शेतकर्यांशी संवाद साधून त्यांना देणार असल्याचे खा.डॉ. विखे यांनी मागे म्हटले होते.
आता याच अनुशंघाने पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे विखे यांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली. ‘के.के.रेंज प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात जाणार आहे,’ अशी घोषणाच खा. डॉ.सुजय विखे यांनी या बैठकीत केली. मात्र, या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटो मध्ये अनेकांनी तोंडाला मास्क लावला नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या खासदार विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच करोना अनुषंगाने नियमावली पाळली गेली
नसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान या बैठकीत त्यांनी ‘के.कें.रेंज प्रश्नाबाबत येत्या दोन दिवसात २३ गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे व नंतर अंतिम भूमिका मांडणार आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो.
१९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे.
या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली असून नागरिक चिंतेमध्ये असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राहुरी, नगर, पारनेर तालुक्यांतील २३ गावांमधील शेतकऱ्यांकडून विस्तारीकरणाला विरोध वाढत आहे.
याशिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू लागले आहेत. त्याच अनुषंगाने विखे यांनी आजपासून शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी दौरा सुरू केला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved