सोयाबीन पिकावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शेतातील तणाऐवजी सोयाबीनचे पाच एकर पीक जळाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे नुकतीच उघडकीस आली. त्यामुळे संबंधित तणनाशक निर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा महादेव येथील सुनील भास्कर कसार यांनी भोकर येथील कृषी सेवा केंद्रातून एका तणनाशकाची खरेदी केली होती. सदरचे तननाशक सोयाबीन पिकावर मारल्यानंतर पाच एकर क्षेत्रातील सोयाबीनचे जळाल्याचे निदर्शनास आले.
याबाबत त्यांनी आमदार लहू कानडे यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. आ. कानडे पावसाळी अधिवेशनानिमित्त मुंबईत असल्याने त्यांनी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याबाबत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यास तातडीने मदतीच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार माजी नगरसेवक अशोक कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी सरपंच सचिन पवार यांनी वडाळा महादेव येथे कासार यांच्या शेतावर भेट देऊन पाहणी केली असता सोयाबीनचे पीक जळून गेल्याचे आढळून आले. कानडे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे तसेच कृषिअधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशा सूचना केल्या.
तसेच तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना संबंधित पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करावा, असे सांगितले, त्यानंतर कामगार तलाठी घोरपडे यांनी यावेळी पिकाचा पंचनामा केला. संबंधित तननाशक निर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करून कासार यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक कानडे यांनी यावेळी केली.