Ahmednagar News : होळीचा सण पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठ्यांना मागणी आहे. दुसरीकडे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने यावर्षी साखर गाठ्यांच्या भावात वाढ झाली आहे.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे होळीच्या अगोदर पंधरा दिवसांपासून गाठ्या तयार करण्यास सुरुवात होते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत गाठ्यांना मागणी असते. पूर्वी शिवरात्रीपासून पाडव्यापर्यंत महिनाभर हा व्यवसाय चालायचा, अगोदर मालाची बुकिंग केली जायची व नंतर माल दिला जायचा.
गुढीपाडव्याला गुढीला गाठीचा हार घातला जातो. तर होळीला गावखेड्यातील लोक एकमेकांच्या घरी लहान मुलांना गाठी व कडे देतात, गुढीपाडव्यापर्यंत गाठयांना मागणी असते तर लग्न ठरलेल्या व या काळात लग्न झालेल्या नववधूला गाठी, साडी-चोळी घेण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात पाळली जाते.
होळीचा सण जवळ आल्याने गाठी उद्योगाला नव्या जोमाने सुरुवात झाली आहे. गाठ्यांना मागणीही भरपूर आहे. शहरटाकळी येथे तयार केलेल्या गाठीला परिसराबरोबरच नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागणी आहे.
गाठ्यांचा किरकोळ विक्रीचा भाव १०० ते १२० रुपये किलो आहे तर ठोक ७० ते ९० रुपये किलो आहे. परिसरातील अनेक किरकोळ व्यापारी ठोक माल नेतात. साखरेच्या भावात वाढ झाली नसली तरी इंधन, साखर पावडर, दोरा, दुध, या कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली आहे.
दुसरीकडे मजुरीचा प्रश्न गंभीर आहे. वाढीव दर देऊनही मजूर मिळत नाही, यामुळे हा उद्योग करण्यासाठी अडचण येते. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून हा पारंपारिक उद्योग असल्याने आम्ही हा उद्योग टिकून ठेवला आहे, असे दत्तात्रय गादे यांनी सांगितले.
पांढऱ्या शुभ्र गाठ्या हे आमच्या गाठ्यांचे वैशिष्ट्य आहे. वीस ग्रॅमपासून ५०० ग्रॅमपर्यंत एक गाठी असते. दररोज ७० ते १०० किलो माल तयार होतो. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आमचे कुटुंब या व्यवसायात आहे. -दत्तात्रय ठकाजी गादे, शहरटाकळी