मानसिक आरोग्याबाबत भारत आजही अंधारयुगात – डॉ वटवानी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- तातडीच्या उपचारांची प्रतीक्षा असलेले १९ कोटी मनोरुग्ण , ८५ टक्के जिल्ह्यात एकही मानसोपचार तज्ञ उपलब्ध नसणे तसेच मानसिक आजारी माणसांचा होणारा सर्रास छळ , घृणा आणि सामाजिक बहिष्कार अशी भारताची भयावह स्थिती आहे.

मानसिक आरोग्याबाबत भारत आजही अंधारयुगात असताना तुलनेने क्षुल्लक काम असताना पुरस्कार स्वीकारताना लाज वाटते ,असे प्रतिपादनरॅमन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित डॉ. भरत वटवानी यांनी येथे केले.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने स्नेहालय परिवाराने ‘बा आणि बापू पुरस्कार’ सुरू करण्यात आले.

पहिल्या बापू पुरस्काराने मानसोपचार तज्ञ डॉ. वटवानी आणि बा पुरस्काराने बुलढाणा येथील सेवासंकल्प संस्थेच्या संचालिका सौ. आरती नंदू पालवे यांना सन्मानित करण्यात आले.

सौ. रूपाली मुनोत, बालकल्याण संकुल(केडगाव , अहमदनगर) येथे पद्मश्री पोपटराव पवार, पंजाब सरकार मधील कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सेस नीळकंठ आव्हाड ,ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक महावीर जोंधळे, राष्ट्रपती पुस्कार प्राप्त ध्वनी अभियंता कामोद खराडे , इंदुमती जोंधळे यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

५०हजार रुपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ.नीरज करंदीकर यांनी डॉ.वटवानी यांची तर समुपदेशक दीपा निलेगावकर यांनी आरती पालवे यांची प्रकट मुलाखत घेतली.

कर्जत (जिल्हा रायगड) श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन, स्थापन करून दहा हजारांवर मानसिक आजारी रुग्णांना डॉ. वटवानी यांनी संपूर्ण बरे केले. त्यांच्या निरंतर औषधोपचार आणि आधाराची सोय करून त्यांच्या घरी त्यांना पून:स्थापित करण्याचे अतुल्य काम मानसोपचारतज्ञ वटवानी यांनी केले.

त्यासाठी त्यांना जगातील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार वर्ष २०१८ मध्ये मिळाला होता. चिखली (जि. बुलढाणा )येथे मानसिक आजारी रुग्णांची सेवा-सुश्रुषा आणि कौटुंबिक पुनर्वसन सौ.आरती आणि नंदू पालवे या दांपत्याने कूठली ही संसाधने आणि पाठबळ नसताना केली.

अहमदनगर शहर आणि पंचक्रोशी बेवारस मनोरुग्ण मुक्त करण्यासाठी सर्व मानसोपचार तज्ञ ,इतर डॉक्टर,संस्था आणि संवेदनशील नागरिकांनी एकत्रित काम करावे असे आवाहन वट वानी आणि पालवे यांनी मुलाखतीत केले.याच उद्देशाने निर्माण होणारा मानसग्राम प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल ,असेही त्यांनी नमूद केले.

पुणे जिल्ह्यातील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक आणि माजी आमदार श्‍यामकांत दामोदर मोरे यांची यंदा जन्मशताब्दी आहे. सिताबाई मांढरे या एक सामाजिक जाणीव संपन्न गृहिणी होत्या. या दोघांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे कुटुंबीय सौ. भारती आणि श्री किरीटी श्यामकांत मोरे यांनी दिलेल्या ठेवीतून ‘बा आणि बापू पुरस्कार’ यापुढे दिले गेले.

महावीर जोंधळे यांनी परिचयात नमूद केले की, स्व.श्यामकांत मोरे आमदार असून सायकल वर फिरायचे, २ खोल्याच्या घरात राहायचे.त्यांची पत्नी इंदिराबाई शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत राहिली.आपल्या गरजा कमी आणि चारित्र्य शुद्ध ठेवणाऱ्या मोरे यांचा वारसा आज राजकारणातून लुप्त झाला आहे.

नितीहिन झालेल्या राजकारणात महात्मा गांधी प्रत्यक्ष जगणाऱ्या स्व.श्यामकांत मोरे यांची स्मृती प्रेरक ठरेल,असे जोंधळे म्हणाले. डॉ.दया भोर यांनी सूत्रसंचालन केले.राजीव कुमार यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment