भारत बंद मध्ये सहभागी होत, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी भारत बंदला प्रतिसाद देत राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने करुन जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात बाळासाहेब मिसाळ, राजेंद्र करंदीकर, शिवाजी भोसले, डॉ. भास्कर रणनवरे, इमरान जहागीरदार, अशोक साळवे, मनोहर वाघ, गणेश चव्हाण, सुभाष गायकवाड, शामराव काते, सुरेश गायकवाड, संजय सावंत,

राजू शिंदे, समीर शिंदे, दादासाहेब शिंदे, मुफ्ती अल्ताफ, भाऊसाहेब फुलमाळी, अमोल ठुबे, नवनाथ शिंदे, आयुब शेख, विजय सोनवणे, अविनाश देशमुख, किरण सोनवणे आदि सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्यासाठी शेतकर्‍यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणार्या पाण्याचे फवारे मारणारे

आणि लाठीचार्ज करून अत्याचार करणार्‍या भाजप सरकारचा तीव्र निषेध यावेळी नोंदविण्यात आला. केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारने देशात नवीन कृषी कायदे पारित केले आहे. हे कायदे शेतकर्‍यांसाठी घातक असून, त्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविणारे आहे. या कायद्या विरोधात संपुर्ण देशात शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष पसरलेला आहे.

केंद्रातील भाजप सरकारने देशात शेतकर्‍यांचे नुकसान करणारे भांडवलशाहीला पोषक असणारे शेतकरी विरुद्ध कायदे पारीत केले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करावेत, शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा,

निर्धारित हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षेची तरतुद करावी, केंद्र सरकारने कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे व भांडवलशाहीला पोषक असणारे नवीन कामगार विरोधी कायदा पारित केले असून, ते देखील रद्द करण्यात यावे, लोकशाही वाचविण्यासाठी देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment