अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-थकित वेतन, किमान वेतन व विमा संरक्षण देऊन जिल्ह्यातील रुग्णवाहिका (102 नंबरच्या) कंत्राटी वाहन चालकांवरील अन्याय दूर करण्याची मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. क्षीरसागर यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, वजीर सय्यद, गणेश निमसे, अंकुश ठोकळ, गौरव बोरकर, दिपक गुगळे, सुशील नहार, शहानवाज शेख, वसीम शेख, अमोल भंडारे, श्रीपाद वाघमारे आदींसह कंत्राटी वाहन चालक उपस्थित होते.

जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचे कंत्राटी वाहन चालक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहेत. परंतु प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक वाहन चालकावर अन्याय करण्यात येत आहे. मागील 10 ते 18 महिन्यापासून वाहनचालकांचे वेतन देण्यात आलेले नाही.
दिवाळी सणापुर्वी त्यांचे वेतन अदा करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटकाळात 24 तास काम सुरू असूनही शासनाने वाहनचालकास 50 लाखाचा विमा कवच दिलेला नाही. एकाही वाहनचालकाचा विमा काढण्यात आलेला नाही. वाहन चालकांच्या वेतनामधून 1 हजार रुपये पी.एफ. कपात केली जाते.
परंतु पी.एफ. खात्यामध्ये 627 रुपये जमा होतात. 15 वर्षापासून वाहन चालक कार्यरत असून, त्यांना अद्याप पर्यंत शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन मिळालेले नाही. किमान वेतनानुसार ई टेंडर घेण्यात आलेले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
रुग्णवाहिकेच्या कंत्राटी वाहन चालकांवरील अन्याय दूर होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना समान काम समान वेतन लागू करण्यात यावे, सर्व वाहनचालकांचे शासन निर्णयानुसार पी.एफ. कपात केली जावी, कै. ज्ञानेश्वर गोरे प्राथमिक आरोग्य केंद्र,
टोका (ता. नेवासा) येथील वाहन चालक चार वर्षांपूर्वी अपघातात मयत झाले आहे. परंतु शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत दिलेली नसून, त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved