अहिल्‍यानगर मध्‍ये संत साहित्‍य संमेलन व्‍हावे हा मोठा अभिमान – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

Published on -

Ahilyanagar News : संत साहित्‍य केवळ धर्मापुरते आणि भक्‍तीपुरते सिमीत नाही तर, समाजाच्‍या उध्‍दाराकरीता उपयुक्‍त ठरले आहे. या संत साहित्‍याने समाजामध्‍ये सत्‍व आणि तत्‍व रुजवितानाच समाजाला सत्‍य सांगून विषमता दुर करण्‍याचे मोठे काम केले असल्‍याचे गौरद्गार १३ व्‍या अखिल भारतीय मराठी संत साहित्‍य संमेलनाचे स्‍वागताध्‍यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काढले.

वारकरी साहित्‍य परिषदेच्‍या वतीने शिर्डी येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या १३ व्‍या अखिल भारतीय मराठी संत साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन सामाजिक न्‍याय मंत्री ना.संजय शिरसाठ यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. त्‍याप्रसंगी राज्‍यातून आलेल्‍या संत साहित्‍य क्षेत्रातील मान्‍यवरांशी संवाद साधून मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी या संमेलना मागील भूमिका विषद केली. वारकरी साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष विठ्ठल पाटील, जेष्‍ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे, संमेलनाचे नुतन अध्‍यक्ष संजय महाराज देहूकर, मावळते अध्‍यक्ष माधव महाराज शिवडीकर यांच्‍यासह राज्‍यातून आलेले वारकरी आणि संत साहित्‍याचे अभ्‍यासक याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, संतांनी भूमी म्‍हणून ओळखल्या जाणा-या अहिल्‍यानगर मध्‍ये १३ वे संत साहित्‍य संमेलन व्‍हावे हा आमच्‍या दृष्‍टीने फार मोठा अभिमान आहे. या जिल्‍ह्यातील प्रत्‍येक तालुक्‍यात असलेले अध्‍यात्मिक ठिकाण हे आमच्‍या दृष्‍टीने मोठी उपलब्‍धी असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन, या अध्‍यात्म्कि दृष्‍टीचा प्रेरणास्‍त्रोत हा पंढरपुरचा पांडुरंग आहे. आणि देहू आळंदी तिर्थस्‍थान संत धर्माची लोक विद्यापीठं आहेत. समाजाच्‍या प्रत्‍येक स्‍तरातून संतरुपे व्‍य‍क्‍त झाली. त्‍यांनी त्‍यांच्‍या जीवनातून साधूत्‍वाचे उद्दात आदर्श प्रगट केले. संतांच्‍या या कार्यातूनच भक्‍तीरुप अवतरले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हजारो वर्षांची परंपरा असलेली आषाडीची वारी ही म‍हाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीचे प्रवाही सजीव रुप आहे. ज्ञानोबा, तुकोबा हे या संस्‍कृतीचे स्‍वास आहेत. संत नामदेवांनी या संस्‍कृतीचा भारतभर प्रचार केला तर, संत एकनाथांनी धर्म मंदि‍राचे आधार बनण्‍याचे काम केले, असा उल्‍लेख करुन, ना.विखे पाटील म्‍हणाले की, संत साहित्‍यातून व्‍यक्‍त होणारी भावदृष्‍टी आणि भावसाधना यांचे आकलन होणे महत्‍वाचे आहे, कारण संत साहित्‍यानेच भक्‍ती आणि सामाजिक शक्‍तीचा संदेश आपल्‍याला दिला आहे. या देशाला भक्‍तीच्‍या एका सुत्रात ववण्‍याचे काम संत साहित्‍याने केले असल्‍याचा गौरवपुर्ण उल्‍लेख त्‍यांनी आपल्‍या भाषणात केला.

संतानी सर्वसामान्‍यांसाठी लिहीलेल्‍या साहित्‍यांमध्‍ये उत्‍कर्षाची दिशा सापडते. समाजाच्‍या प्रश्‍नांची उत्‍तरही मिळतात. त्‍यामुळेच त्‍यातील वैशिष्‍ट्य शोधण्‍यासाठी का होईना संत साहित्‍याचा अभ्‍यास करणे गरजेचे आहे. या संत साहित्‍याने अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्याचा पाया मजबुत करतानाच स्त्रि‍वादी दृष्‍टीकोनही स्‍पष्‍ट केला. त्‍यामुळेच संत मुक्‍ताबाई आणि संत जनाबाई यांच्‍या उल्‍लेखाशिवाय वारी पुर्णत्‍वाला जावू शकत नाही. त्‍याच प्रमाणे संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांनी समाज आणि गाव सुधारणेचा मंत्र हा निद्रिस्‍त समाजाला जागे करण्‍यासाठी उपयुक्‍त ठरला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

केंद्रीय सामाजिक न्‍याय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्‍या भाषणात संताच्‍या विचारांचा वारसा घेवून वारकरी काम करतात. माणसांचे कल्‍याण व सुखदूखासाठी जगण्‍याचा मंत्र वारकरीच देतात. वारकरी संप्रदायात महिलांची संख्‍या लक्षणीय आहे. महिलांवर होणा-या वाढत्‍या अत्‍याचाराचे प्रमाण लक्षात घेवून सामाजिक प्रबोधनासाठी वारक-यांनी अधिक पुढाकार घेण्‍याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

संमेलनाचे उद्घाटक तथा सामाजिक न्‍याय मंत्री संजय शिरसाठी यांनी आपल्‍या भाषणात परमेश्‍वर आणि सर्वसामान्‍य जनता यांच्‍यात संवाद घडवून आणण्‍याचे काम वारकरी करतात. ही संस्‍कृती टिकविण्‍याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे. धर्मसत्‍ता आणि राजसत्‍ता एकत्रित राहील्‍या तरच, समाजाच्‍या उत्‍कर्षाचे काम होवू शकते. त्‍यामुळेच या संमेलनाच्‍या पाठीशी राज्‍य सरकार खंबीरपणे उभे आहे. संमेलनासाठी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली असल्‍याचे त्‍यांनी जाहीर केले.

याप्रसंगी संमेलनाचे अध्‍यक्ष ह.भ.प संजय महाराज देहूकर, ह.भ.प माधव महाराज शिवडीकर व डॉ.सदानंद मोरे यांचीही भाषण झाली. वारकरी साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष विठ्ठल पाटील यांनी प्रास्‍ताविक केले. संमेलनाच्‍या उद्घाटनापुर्वी श्री.साईबाबा मंदिर ते संमेलन स्‍थळापर्यंत वारकरी दिंडी काढण्‍यात आली. दोन दिवस चालणा-या परिषदेला राज्‍यातील वारकरी आणि संत साहित्‍याचे अ‍भ्‍यासक उपस्थित राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe