हेल्प देम ग्रुपच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या युध्दात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत खर्‍या बातम्या देऊन जागृतीचे काम करणार्‍या माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार व वृत्त छायाचित्रकार यांचा भिंगार येथील हेल्प देम ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला.

तर या युध्दात माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रेरणा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. हेल्प देम ग्रुपचे युवक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन विविध उपक्रम राबवित आहेत.

ग्रुपच्या वतीने कोरोना युध्दात योगदान देणारे डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी व पत्रकारांचा सन्मान केला जात आहे. या युध्दात डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी व पत्रकार आपले कर्तव्य बजावत आहे.

पत्रकार वर्ग रस्त्यावर उतरुन सत्य घटनांची माहिती घरबसल्या नागरिकांपर्यंत पोहचवत आहे. त्यांच्यामुळे सोशल मिडीयावर पसरणार्‍या चुकीच्या संदेशाला देखील आळा बसला आहे.

पत्रकार व माध्यमांच्या व्यक्तींनी देखील आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन शुभम भोसले यांनी केले. यावेळी माध्यमाचे निलेश आगरकर, वाजिद शेख, अनिकेत यादव, साजिद शेख, प्रतीक शिंदे, शब्बीर सय्यद यांच्यासह हेल्प देम ग्रुपचे सुमित गुप्ता, शुभम जाधव, शुभम भोसले, योगेश उबाळे आदि उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment