लोकप्रतिनिधी म्हणून आपण मंजूर केलेल्या कामाचे फलक लावून उद्घाटने खासदार अथवा अन्य पदाधिकारी करीत असल्याबद्दल आमदार लहू कानडे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी आ. कानडे म्हणाले की, माझ्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात केवळ विरोधी पक्षातील आमदार आहे म्हणून काही नवीन गोष्टी सुरू झाल्या आहेत. सभागृहात अंतरिम अर्थसंकल्प असेल, अनुदानाच्या मागण्या असतील, त्या सभागृहात मंजूर होतात. परंतु श्रीरामपूर मतदारसंघात एक नवीन प्रथा सुरू झाली आहे.
खासदार महोदयांनी काम मंजूर करून आणल्याचे फलक लावले जात आहेत. कामांचा निधी १०० टक्के राज्य सरकारचा व फलक मात्र खासदारांचा. निधी राज्य सरकारचा, आम्ही शिफारस करून कामे मंजूर करून घ्यायची आणि कोणत्यातरी एका पक्षाचा तालुकाप्रमुख किंवा अध्यक्ष दुसऱ्याचाच फलक लावतो की यांच्या प्रयत्नाने हे मंजूर झाले. असे प्रकार मतदार संघात सुरु आहेत.
राज्य शासनाचा सन २०१५ चा प्रोटोकॉल अधिनियम आहे. त्यात काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामध्ये मतदार संघातील राज्य सरकारची कामे, त्यांची भूमिपूजने, उद्घाटने असतील तर किमान तेथील विधानसभा सदस्याला निमंत्रित केले पाहिजे अथवा सांगितले पाहिजे.
परंतु असे काहीच होत नाही. हा प्रोटोकॉल अधिनियम न पाळता ही नवीनच गोष्ट मतदारसंघात सुरू झाली आहे. यावर सरकारने गंभीरतेने विचार करावा, तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आ. कानडे यांनी यावेळी केली.