त्यात’ गुन्हा दिसतोय.. ‘कोतवाली’चे ‘नगर अर्बन’च्या प्रशासकांना पत्र

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील अडीच कोटीच्या अपहार प्रकरणाच्या तक्रारीची तपासणी केल्यावर प्रथमदर्शनी हा गुन्ह्याचा प्रकार निदर्शनास येत आहे.

त्यामुळे याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद देऊ शकता, असे पत्र कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना दिले आहे.

बँकेची मुख्य शाखा व अन्य शाखांतील संशयास्पद व्यवहारातून अडीच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे सांगितले जाते. त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पण बँकेकडून कोणी फिर्यादी होत नसल्याने हा गुन्हा दाखल होत नसल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर कोतवालीच्या पोलिसांनी आता बँकेच्या प्रशासकांनाच पत्र दिले आहे.

पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी प्रशासक मिश्रा यांना १० डिसेंबरला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ११ सप्टेंबर २० रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, मुख्य व्यवस्थापक सतीशकुमार रोकडे, प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे व मुख्य शाखेचे शाखाधिकारी मारुती औटी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

तसेच बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनीही या अडीच कोटी रुपये रकमेच्या अपहाराबद्दल तक्रार दिली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्जदार यांनी कट रचून व संगनमताने बँकेत खोटी कागदपत्रे तयार करून अडीच कोटीचा अपहार केला व ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक केली आहे

तसेच प्रशासकांच्याच आदेशान्वये चौकशी अधिकारी अॅड. डी.व्ही. चंगेडे यांनी चौकशी करून २९ जून २०२० रोजी प्रशासकांना अहवाल दिला असून, त्याद्वारेही हा अपहार स्पष्ट होत असल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केली आहे.

या दोन्ही तक्रारींची तपासणी केल्यावर त्यामध्ये प्रथमदर्शनी गुन्ह्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे याबाबत आपण (प्रशासक मिश्रा) वा आपण प्राधिकृत केलेल्या वरील चारजणांपैकी कोणीही कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद द्यावी, असे या पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment