Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील मढी येथे मायंबा डोंगर परिसरात फड व बेलदऱ्यात बिबट्याच्या वावराने घबराट पसरली आहे. या बिबटयाने मढी व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर हल्ला करून ठार केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शिवसेनेचे उपतालुक प्रमुख भाऊसाहेब निमसे व ग्रामस्थांनी केली आहे.

मढी येथे आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे. रात्री शेतात जात असताना भाऊसाहेब निमसे यांनी हा बिबट्या रस्त्यावरुन जाताना पहिला. माणसाला पाहून हा बिबट्या डोंगर दयातील झाडीत जाऊन बसला.
निमसे यांनी भ्रमणदूरध्वनीवरून शेतकरी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या आल्याचे कळविले. तिसगाव वनपरिक्षेत अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वैभव गाढवे, वनरक्षक एकनाथ खेडकर, वन कर्मचारी विष्णू मरकड, समीर मोमीन, गणेश पाखरे, या वन कर्मचाऱ्यांनी तातडीने येऊन तीन तास जंगलात शोध मोहीम राबवली.
शोधमोहिमेत ठिकठिकाणी बिबट्याचे ठसे दिसून आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना साधव राहण्याचा सल्ला दिला आहे. पिंजरा लावण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
तीन वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यात व मढी परीसरात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्या भीतीने परिसरात सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.