सहायता निधीबाबत केंद्राकडून दुजाभाव; रोहित पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे अशावेळी केंद्राने राज्यांना वैद्यकीय मदत देणेही बंद केले.

दुर्दैवाने लसीकरणाच्या महत्वपूर्ण मुद्द्याचाही राजकीय प्रचारासाठी वापर केला गेला. या मुद्यावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मोदींसह केंद्रवार निशाणा साधला आहे.

पीएम केअरसाठी सीएसआरमधून निधी देण्यास सूट दिली गेली आणि तीच सूट देताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत मात्र दुजाभाव केला गेला. पीएम केअरला सूट दिली म्हणून विरोध नाही.

पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सूट दिली असती तर काय बिघडलं असतं, असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर महसूल मोठ्या प्रमाणात बुडाल्याने आर्थिक नियोजन पूर्णता विस्कळीत झालेल्या राज्यांना केंद्र सरकारने कुठलीही प्रत्यक्ष आर्थिक मदत न देता केवळ कर्ज उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

तसेच यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की, कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारे आघाडीवर लढत असताना निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांकडे असणे गरजेचे होते; परंतु केंद्र सरकारने सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आणि जसजसा कोरोनाचा प्रभाव वाढायला लागला,

तसतसे केंद्राने हात वर करून राज्यांवर जबाबदार्‍या ढकलायला सुरूवात केली. दरम्यान केंद्राकडून राज्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोपपवार यांनी केला आहे.