डबके आणि घाणीच्या साम्राज्यात हरवला जॉगिंग ट्रॅक

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे व चिखलाचे साम्राज्य झाले आहे.

यातच नगर शहरातील सावेडी उपनगरातील सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान सध्या पाण्याचे डबके आणि घाणीच्या साम्राज्यात हरवला आहे. शहरातील सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानावर ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांची मोठी वर्दळ असते.

सदर मैदानामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अद्यापही नागरिकांसाठी शौचालय उपलब्ध नाही. पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. पावसाचे पाणी मैदानामध्ये साचते. सर्वत्र गवत वाढले आहे.

त्यामुळे सदर मैदानात डास उत्पत्ती मोठ्या प्रमाणात आहे. महापालिकेने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. याबाबत मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.