अहमदनगर: अहमदनगरच्या भाळवणी गावातील राहुल गुंजाळ या तरुण शेतकऱ्याने चक्क स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे. परंतु, महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे पीक नगरमध्ये कसे घेतले जाऊ शकते, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
१५ ते ३५ अंशापर्यंतच्या तापमान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असते. नगर परिसरात हिवाळ्यात तापमानाचा पारा १२ ते २२ अंशापर्यंत असते . त्यामुळे आपण स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करू शकतो याचा विश्वास राहुलला आला आणि त्याने शेतात स्ट्रॉबेरीची रोपे लावली.
तीन महिने या रोपांची योग्य काळजी घेतली. यानंतर राहुलच्या शेतात स्ट्रॉबेरीचे चांगले पीक आले. स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यासाठी राहुलला आठ ते दहा हजार रुपये खर्च आला आहे.
गेल्या महिन्याभरापासून राहुलची स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी जात आहे. रोज आठ ते दहा किलो स्ट्रॉबेरीपासून त्याला एक हजार ते बाराशे रुपये मिळतात.