Health Department Recruitment :- ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील एकूण १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
ही पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे, औषध निर्मात्याची ३२४ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६ पदे, आरोग्य सेवक (पुरूष) याची ३,१८४ पदे आणि आरोग्य सेविकांची ६,४७६ पदे अशी एकूण १०,१२७ रिक्त पदांची भरण्यात येणार आहे.
मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार या पाच संवर्गासाठी एकूण ४ लाख २ हजार १२ अर्ज प्राप्त झाले असून या प्राप्त अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहे.