Ahmednagar News : लग्न मोडलेल्या मुलीचे पुन्हा नाव घ्यायचे नाही व तिच्या वाट्याला जायचे नाही, असे सांगून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या कोल्हेवाडी येथील युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडगाव पान शिवारात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन सिताराम खुळे (वय ३२, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे यांनी नितीन खुळे यास कोल्हेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविले.
या ठिकाणी त्याला धमकी देण्यात आली. यामुळे नितीन याने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वडगाव पान शिवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत संजय तुकाराम खुळे याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करीत आहे. दरम्यान, नितीन याने आत्महत्या केल्याने त्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. नितीन याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेतला होता.
मयत नितीन याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ क्लिप बनवून व्हायरल केली आहे. गावातील अनेकांनी मला त्रास दिला. यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत, असे त्याने या क्लिपमध्ये म्हटले आहे.