बिल मागितल्याच्या कारणावरून मयताच्या नातवाला मारहाण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- शासकीय नियमानुसार ऑडिट करून पक्के बिल मिळावे, अशी मागणी मयताच्या नातवाने केल्याने संतापलेल्या डॉक्टर व अन्य दोघांनी नातवास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील वाणी हॉस्पिटलसमोर घडली.

याप्रकरणी डॉक्टर प्रतिक वाणी व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की सुमन मारुती खतोडे (रा. राजापूर) या कोरोनाबाधित झाल्याने त्यांना दिनांक २६ एप्रिल रोजी संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील डॉ. प्रतिक वाणी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असताना सुमन खतोडे यांचे निधन झाले. त्यांचा नातू संकेत रामनाथ खतोडे याने रुग्णालयाचे ६० हजार व मेडिकल स्टोअर्सचे ३५ हजार असे एकूण ९५ हजार बिल अदा केले होते. उर्वरित ६० हजार रुपये बिल त्याला भरण्यास सांगण्यात आले होते.

शासकीय नियमानुसार ऑडिट करून आधीच्या उपचाराचे जे बील निघेल ते भरण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगून आम्हाला पक्के बिल मिळावे, अशी मागणी संकेत खतोडे याने डॉक्टर वाणी यांच्याकडे केली. याचा राग आल्याने डॉ. प्रतिक वाणी, रुग्णालयातील परिचारिका व मेडिकल स्टोअर्समधील वामन या तिघांनी त्यास शिवीगाळ करून मारहाण केली.

यावेळी त्याला अश्लील शिवीगाळही करण्यात आली. तुमची बिल भरण्याची लायकी नाही, तुम्ही येथून निघून जा, असे म्हणून त्याला ढकलून देण्यात आले.

यामुळे संतापलेल्या संकेत खतोडे याने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉ. प्रतिक वाणी, परिचारिका, मेडिकलवाला वामन या तिघांविरुद्ध भा.द.वि. कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe